लॉरेन्स स्वामीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक

अहमदनगर : 

नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सैनिकनगरमधील ‘स्वामी रेसिडेन्सी’ या बंगल्यातून लॉरेन्स स्वामी याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली आहे.  

 

स्वामीविरुध्द काही दिवसापूर्वी भिंगार पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.  या गुन्ह्यामध्ये पसार असलेला लॉरेन्स स्वामी हा घरी लपून बसला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातच त्याच्या घरी लग्नकार्य होते.  लॉरेन्स स्वामी हा घरीच होता.  ही खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरू केली.  आपल्याला अटक होत असल्याचे समजताच स्वामी हा घरात लपून बसला.  त्यावेळी त्यांनी घरातील माणसांना बाहेर काढले आणि स्वतः एकटा घरातच राहिला.  पोलीस लॉरेन्स स्वामीला सरेंडर होण्याच सांगत होते. परंतु तो घराबाहेर आलाच नाही.  सकाळी ७ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत लॉरेन्स स्वामी हा घराबाहेर आलाच नाही. 

 

सहायक निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली.  त्यानंतर उपअधीक्षक विशाल ढुमे स्वतः लॉरेन्स स्वामी यांच्या बंगल्यावर दाखल झाले.  त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त फौजफाटा बोलविला.  लॉरेन्स स्वामी याला पोलीस अटक करणार असल्याची माहिती शहरासह जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरली.  शेवटी लाऊड स्पिकरवर पोलिसांनी त्याला घराबाहेर येण्याचे आवाहन केले. पोलिसांनी, अशा चार घोषणा केल्या. परंतु स्वामी घराबाहेर आला नाही. अखेर दरवाजा तोडून त्याला पोलिसांनी अटक केली.