लोकार्पण सोहोळ्याचे फलक काढून घ्यावेत

नगर – – – शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू झालेत . या वादाचा फायदा घेऊन समाजकंटकांकडून कार्यक्रमासाठी लावलेल्या फलकांची फांडतोड अथवा विटंबना होऊन कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . त्यामुळे सदर फलक काढावेत , अशा सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने महापालिकेला देण्यात आल्या आहेत . रविवारी ( दि .६ ) बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकृत पुतळ्याचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमानंतर शहरात राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत . शिवसेना , काँग्रेसपाठोपाठ भाजपनेही या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला व आमदार जगताप यांना टार्गेट करत टीकेची झोड उठवली आहे . सोशल

मीडियातही या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे . या वादाच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे . ‘ लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडलेला असून लोकार्पण सोहळ्यामध्ये राजकीय पक्षामध्ये मतभेद होऊन आरोप प्रत्यारोप चालू आहेत . राजकीय पक्षातील या वादाचा फायदा घेवून लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डची समाजकंटकाकडून विटंबना अथवा फाडतोड होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे लावण्यात आलेले बोर्ड तसेच इतर लावण्यात आलेले फ्लेक्स काढून घ्यावेत ‘ , असे पोलिसांनी म्हटले आहे . आयुक्तांनी याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत .