सरकारला सद्धबुद्धी द्या, मनोज जरांगे यांचे साईबाबांना साकडे

शिर्डी : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्धबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी काल १३ ऑगस्टला साईचरणी केली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण रॅली नगरहून नाशिकला जाताना, सोमवारी रात्री उशिरा जरांगे पाटील शिर्डीत दाखल झाले आणि मंगळवारी सकाळी जरांगे पाटील यांनी साईदरबारी हजेरी लावली. नंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी छगन भुजबळ, प्रवीण दरेकर यांच्यासह राजकारण्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप आहे. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पण, त्यांना आम्ही काहीच करणार नाही. ते खुर्चीवर बाहेर बसलेले असले तरी त्यांच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही असे जरांगे पाटील म्हणले. साई संस्थानच्या वतीने डेप्युटी सीईओ तुकाराम हुलंवळे यांनी जरांगे-पाटील यांचा साईमूर्ती व शाल देऊन सत्कार केला.

यावेळी मंदिरप्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, बाळासाहेब कोते, नवनाथ मते तसेच मराठा समाजाचे सचिन चौगुले आदी उपस्थिती होते. पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १२ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्हांला वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून झुलवत ठेवले जात आहे; त्यामुळे येत्या २९ ऑगस्ट रोजी आम्ही निर्णय घेणार आहोत. नारायण राणे यांचा मी सन्मान करतो. त्यांच्याविषयी काहीही बोलणार नाही, त्यांनीही काही बोलू नये आणि समाजाच्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.