अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक

अहिल्यानगर : अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांविषयी शासन सकारात्मक असून, त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहांत झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, महानगरपालिका उपायुक्त प्रियांका शिंदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, अल्पसंख्याक समाज प्रतिनिधी यश शहा, हरजितसिंग देवेंद्रसिंग वधवा, सय्यद वहाब व सय्यद अफजल, अब्दुल कादर आदी उपस्थित होते. जिल्हा अल्पसंख्याक समितीची दर तीन महिन्यांतल्या पहिल्या मंगळवारी बैठक आयोजित करण्यात यावी, अशी सूचना करीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितीत अल्पसंख्याक प्रतिनिधींकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्पसंख्याक समाजाच्या वतीने उपस्थित प्रतिनिधींनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मते मांडली. बैठकीला अल्पसंख्याक विभागाच्या योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.