धकाधकीचे दिवस आणि मिशन राहत 2

धकाधकीचे दिवस आणि मिशन राहत 2
मागील 2 महिने कोव्हिड केअर सेंटर मधील काम 7 जून ला पूर्ण झाले. कारण कोरोना पेशंट संख्या कमी झाली. हळूहळू आयसोलेशन ची नगर तालुक्याची गरज कमी झाली. यामुळे शेवटचा पेशंट संपले . कोव्हिड केअर सेंटर 68 दिवसांच्या अखंड सेवा व्रता नंतर पुढील दिशेने जात आहे. हे दिवस अक्षरशः खूप ताणाचे होते. आम्हा सर्वांना रोज 200 शे च्या आसपास फोन यायचे. सतत बेड मिळवणे आणि उपचार देणे हा एकमेव उद्योग सर्वांचा होता. आमची स्नेहालय परिवारातील अनामप्रेम टीम,स्नेह ज्योत टीम,प्रतिसाद टीम,स्नेहांकुर टीम, पुनर्वसन संकुल टीम, हॉस्पिटल टीम,युवा निर्माण टीम, बालभवन टीम, चाइल्ड लाईन टीम, जि.के.एन.प्रकल्प टीम अशा सर्व टीम धावल्या. खूप जीव सर्वांनी ओतला. 650 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण कोव्हिड मुक्त झाले. सर्वांना मोफत उपचार केल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्ण जाताना कोरोना सेंटरच्या इमारत गौरांग शाळेला पाया पडून जात होते.हीच कामाची पावती मिळाली. अनेकांना मदत करता आली असे मागे वळून पाहिल्यावर वाटते. ही भावना खूप प्रेरणा देते हे नक्की. साधना आजी (साधना आमटे )यांच्या शब्दात म्हणायचे तर या कृतीचे फिक्स डिपॉझिट आमच्या प्रत्येकाच्या मनात जमा झालेय.
डॉ.गिरीश बाबा यांच्या ‘आज आता ताबडतोब’ कृती मुळे खूप भरीवपणे मिशन राहत आकारले गेले. नगरचे उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले, नगर तालुका प्रांत श्रीनिवास साहेब, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती मांडगे ,डॉ.शंकर केदार, डॉ.प्रियांका पाटील यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. नगर तालुका पंचायत समिती चे डॉ.दिलीप पवार , नगर जिल्हा परिषदेचे मा.माधव लामखेडे यांनी मोठे पाठबळ दिले. वरील नावे केवळ प्राथमिक आहेत. अनेक हात या कामास लाभले म्हणून हे काम आकारले गेले. हा सेवेचा गोवर्धन उभारला.

मिशन राहत 2 ची सुरुवात-

कोव्हिड च्या दुसऱ्या लाटेने खूप मोठी क्षिती केली. अनेक कुटूंबे उध्वस्त झाली. अनेक जवळचे गेले.घर उघडी पडली. अनेक जण बेवारस झाले. सर्व परिसर सुन्न वाटतोय. पुढे काय होणार ..? या एकाच प्रश्नांने छातीत धडकी भरवत आहे. आपण या परिस्थितीला रचनात्मक पद्धतीने प्रतिसाद देण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार पुढील काम सुरू केलेय.
नगर तालुका हे पहिल्या 60 दिवसासाठी कामाचे क्षेत्र ठरवले. नगर तालुक्यातील 106 गावात जाऊन पुढील कामे सुरू आहेत.
गावातील प्रत्येक कोरोना ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटणे. आर्किटेक्ट असोसिएशनचे त्यांना 15 दिवस पुरेल एवढे किराणा किट देणे. स्नेहालय परिवारातर्फे 30 हजार रुपये मासिक मिळवून देण्यासाठी माहिती फॉर्म भरणे.त्या कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती पाहून शैक्षणिक पालकत्व बाबत माहिती घेणे, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यास मदत करणे, कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांची नेत्र तपासणी करणे,आरोग्य कार्ड भरून घेणे ही कामे सुरू आहेत.शासन दरबारी अथवा संस्था पातळीवर नगर जिल्ह्यातील कोव्हिड पीडित कुटूंबे 2 वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांची कोरोना भेदक स्थिती काही अंशी सारवरणे या एकमात्र हेतूने ही धावपळ सुरू आहे. याबाबत आपण आपली मदत-मार्गदर्शन जरूर कळवावे. याविषयी अनुभवाचे संचित लवकरच आपणाजवळ आम्ही सर्व टीम पोहचवत आहोत.
मागील 8 दिवसाचे निरीक्षण पाहता कोरोना काही प्रमाणात दडलाय फक्त. रोजच्या तपासण्या व बाधित संख्या कमी अधिक होताना दिसतेय. लसीकरण करा. कोरोना प्रतिबंधक नियम कसोशीने पाळण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.