एमपीएससीची पूर्वपरीक्षा अखेर टाकली लांबणीवर ; परीक्षार्थीच्या आंदोलनानंतर आयोगाचा निर्णय

एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या परीक्षार्थीच्या आंदोलनाची दखल घेत आयोगाने रविवारी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. या परीक्षांसाठी २५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परिणामी परीक्षार्थी एका परीक्षेला मुकणार होते. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विनंती केली होती. आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता, त्यामुळे संतप्त परीक्षार्थीनी पुण्यात शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एमपीएससीच्या अध्यक्षांना परीक्षार्थीच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.