Mumbai Jumbo Covid Center Convert To Vaccination Center

मुंबईत लसीकरणासाठी 100 केंद्र तयार

मुंबई : 

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरचे रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रात केले जाणार आहे. मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जय्यत तयारी सुरु झाली आहे . जम्बो लसीकरण केंद्र हा त्याचाच एक भाग असल्याची माहिती कोव्हिड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांनी दिली.  मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचे रुपांतर हे जम्बो लसीकरण केंद्रांमध्ये केले जाणार आहे. मुंबईतील बीकेसी, गोरेगाव नेस्को, दहिसर, मुलुंड, NSCI वरळी, या ठिकाणी ही जम्बो लसीकरण केंद्रे असतील. जम्बो कोव्हिड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. कोव्हिड सेंटर आणि लसीकरण केंद्र यातील लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल

              जम्बो कोव्हिड सेंटरची रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे आता जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जाईल, असे डॉ. राजेश ढेरे म्हणाले. बीकेसीमधील कोव्हिड सेंटरमध्ये जेथे रुग्ण नाहीत, अशा जागेत जम्बो लसीकरण केंद्र सुरू होत आहे. यात दिवसाला अडीच ते पावणे तीन हजार रुग्णांना  लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रात 10 युनिट असणार आहे. यातील प्रत्येक युनिटमध्ये डॉक्टरांची स्वतंत्र टीम असणार आहे.  मुंबईतील चार प्रमुख रुग्णालयात कोरोनाची लस ठेवली जाणार आहे. यात मुंबईतील सायन, केईएम, नायर आणि कूपर अशा चार रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट  जागा ही खास कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी या पाच ठिकाणी लसीची साठवणूक केली जाईल.  मुंबईत लसीकरणासाठी 100 केंद्र तयार करण्यात येतील. या केंद्राद्वारे एका दिवशी 50 हजार लोकांना लस टोचण्यात, येईल असं सुरेश काकाणी म्हणाले. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजार लोकांपासून सुरुवात करण्यात येणार आहे, असं  काकाणी म्हणाले. प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान ५ लसीकरण केंद्रे असतील,अशी तयारी सध्या सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.