नेवासातल्या आत्या-भाच्याला आजच्या शपथविधीचे निमंत्रण
नेवासा तालुक्यातील चिंचोलीच्या रेणुका सुनील गोंधळी व त्यांच्या १० वर्षे वयाचा भाचा वेदांत यांना आज ५ डिसेंबर रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. चिंचोलीच्या रेणुका गोंधळी यांचा कणकोरी (ता. गंगापूर) येथील भाचा वेदांत हा २०१९ मध्ये असाध्य आजाराने पीडित होता. वेदांतचे वडील वाळुंज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात, तर आई शेतात मजुरी करते. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्याची आत्या रेणुका गोंधळी नजीकच्या चिंचोली येथे राहतात. त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारारोटी तत्काळ १ लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात वेदांतवर उपचार झाले. त्यामुळे त्यांला जीवनदान मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेने वेदांतचे कुटुंब भारावून गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभीष्टचिंतनाचे औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवले. ही घटना लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी शिवशाहीर सुनील गोंधळी रेणुका गोंधळी व वेदांत पवार यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले