आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : सन १९९१ मध्ये नवे आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाचा कायापालट करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कर्नाटकच्या बेळगाव शहरात कार्यकारिणीची बैठक सुरू होती ती बैठक अर्धवट सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रात्री दिल्लीत दाखल झाले. निधनाचे वृत्त कळताच माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयास भेट दिली. डॉ. मनमोहन सिंग गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. देशाचे १३ वे पंतप्रधान असलेले डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाबमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांच्या पश्चात पत्नी गुरुशरण कौर आणि तीन मुली आहेत.