पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा  मोदी व शहांच्या नावाने शंखध्वनी 

कोल्हापूर:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोदी व शहांच्या नावाने शंखध्वनी करत गनिमी काव्याने आणलेल्या पुतळ्याचे दहन केले. झाल्या प्रकारावरुन संतापलेल्या राजू  शेट्टी यांनीही मुर्दाबादच्या घोषणा देत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दम दिला. यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा सुरु झाल्या.

एवढ्यात एक चारचाकी वाहन  मोर्चेकरीजवळ येऊन थांबली. पोलीसांची नजर चुकवून पिंजरापासून तयार केलेला पुतळा बाहेर काढत असतानाच पोलीसांनी धाव घेतल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये झोेंबाझोंबी सुरु झाली. पुतळा पेटवतील म्हणून पोलिसांनीही लगेच पाण्याच्या बादल्या भरुन मारायला सुरुवात केली. एवढ्यात पुतळा खेचाखेची सुरु असताना पोलीसांनी राजू शेट्टी यांची कॉलर धरल्याने शेतकरी कार्यकर्ते अधिकच संतापले.

पोलिसांवरच धावून गेल्याने पोलिसांनी रेटारेटी सुरु केली. यात शेट्टी यांची घड्याळही हातातून पडले, चप्पल बाजूला फेकल्या गेल्या. हा प्रकार पाहून अधिक संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पुतळयाचे शिल्लक राहिलेले अवशेष पेटवून दिले. पोलीसांनी जमावाला पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. १० मिनिटे चाललेल्या या झटापटीमध्ये अनेकांचे अंगावरचे कपडेही फाटले.