पुण्यात पुस्तक महोत्सवात २५ लाख पुस्तकांची खरेदी
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाने इतिहास रचला. यंदाच्या महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन तब्बल २५ लाख पुस्तके खरेदी केली. यातून ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही उलाढाल चौपट आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी रविवारी दिली. गेल्या वर्षी साडेचार लाख नागरिकांनी भेट देत ११ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी केली होती. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. हा महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आला होता. या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद देत तीन दालनांमधील ७०० स्टॉलमधून लाखो पुस्तकांची खरेदी केली आहे. यासोबतच पुणे बाल चित्रपट महोत्सव, मुलांसाठी विविध कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुणे लिट फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती पांडे यांनी दिली. पुस्तक खरेदीत सहभागी झालेल्यांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात ५० टक्के तरुण, २५ टक्के लहान मुले सहभागी झाली होती हे आश्वासक चित्र पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दीड लाख शालेय विद्यार्थी व तितकेच महाविद्यालयीन तरुण यात सहभागी झाले होते. या महोत्सवात आलेल्या वाचनप्रेमींनी तब्बल ४० कोटी रुपयांची २५ लाखांपेक्षा अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. त्यामुळे वाचन करणारे पुस्तके खरेदी करून वाचतात हे सिद्ध झाले आहे. या महोत्सवाला सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिसाद मिळाला असून महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा एक कोटीहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने आस्वाद घेतला. या महोत्सवात १०० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे किमान १ हजार लेखकांनी पुस्तक प्रदर्शनात भेट दिली. सांस्कृतिक वातावरणात हा महोत्सव न्हाऊन निघाला.
चार विश्वविक्रम : या महोत्सवात एकूण ४ विश्वविक्रम झाले. हे विश्वविक्रम पुस्तकांच्या सहभागानेच झाले. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संविधानाच्या मुखपृष्ठाचे शिल्प पुस्तकांच्या साहाय्याने तयार करण्यात आले. त्यासाठी ९७ हजार २० पुस्तकांचा वापर केला गेला, असे राजेश पांडे यांनी सांगितले.