शाळा सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची शपथ!

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी, सावित्रीबाईंचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी रात्र शाळेचा पुढाकार!

अहिल्यानगर : स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला व मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची शपथ घेतली. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन त्यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्त्री शिक्षण अभियानाची शपथ घेण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना प्रोत्साहित करुन नाईट हायस्कूलच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ज्युनिअर कालेज भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. अंशू मुळे, स्नेहालय संचलित बाल भवन प्रमुख उषा खोल्लम, शालेय समितीचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, सखी सावित्री समिती सदस्या प्राची शेटिया आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचे बीज रोवले. समाजाचा विरोध झुगारुन त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्याने आज स्त्रीयांना समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे. चूल आणि मूल या परंपरेमधून स्त्रीला सावित्रीबाईंनी बाहेर काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अंशू मुळे म्हणाल्या की, सावित्री बाईंनी रूढी परंपरा झुगारून शिक्षणाने सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली. शिक्षणाने कुतूहल जागृत झाले पाहिजे व मिळालेल्या शिक्षणाचा आपल्या जीवनात योग्य वापर करता आला पाहिजे. स्वतःमधील क्षमता ओळखून यशस्वी होण्यासाठी योग्य वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. उषा खोल्लम यांनी मुलींनी चार भिंती ओलांडून जग पहावे. जग खूप मोठे आहे. समाजाचा विचार न करता आपल्या ध्येयाशी व विचारांशी प्रामाणिक रहा. ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करा, जो शिकेल तो टिकेल! हा संदेश त्यांनी दिला. सावित्रीची भूमिका साकारलेल्या रात्र शाळेची विद्यार्थिनी निकिता चव्हाण हिने शिक्षणाचे महत्त्व सांगितले. स्वाती होले यांनी उपस्थितांना शिक्षणापासून दुरावलेल्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याची शपथ दिली. पाहुण्यांचे परिचय अनुराधा दरेकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली साताळकर यांनी केले. आभार वैशाली दुराफे यांनी मानले. यावेळी शालेय शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत,अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे,उज्वला साठे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, शरद पवार, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेज कर, पालक प्राची शेटीया, सीमा भोर, भाग्यश्री कांबळे आदींसह रात्रशाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.