शेवटच्या क्षणी निर्णय बदलून, नगर-श्रीगोंद्यामध्ये ठेवले बंड कायम!
अहिल्यानगर : अहमदनगर व श्रीगोंदा मतदारसंघात मविआ नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात अपयश आले. श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अखेरच्या क्षणी निर्णय बदलत आपली उमेदवारी कायम ठेवली. श्रीगोंद्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आली व तेथे अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. सोमवारी नक्षत्र लॉन येथे मविआची बैठक झाली. त्यात अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा व इतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अडीच वाजता शिवसेनेचे तीनही बंडखोर उमेदवार निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. तेथे बोराटे व फुलसौंदर यांनी अर्ज मागे घेतले. मात्र जिल्हाप्रमुख गाडे यांनी ऐनवेळी निर्णय बदलत आपली उमेदवारी कायम ठेवली. दरम्यान, अवघे काही सेकंद उशीर झाल्याने माझा अर्ज कायम राहिला, असे स्पष्टीकरण गाडे यांनी दिले. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीच्या सुमारे २० मिनिटे आधीच ते या कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळे गाडे यांनी ऐनवेळी निर्णय बदलल्याची चर्चा रंगली आहे.