वाई :
सातारा शहरातील कास रस्त्यावरील पॉवर हाऊस मध्ये शुक्रवारी रात्री अंडी उधार देण्यास नकार दिल्यामुळे पान टपरी चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडलीय. बबन गोखले असं पान टपरी चालकाचं नाव आहे. गोखले यांचा दोघांनी धारदार शस्त्राने रात्री उशिरा खून केला. मागील चार दिवसात दुसरी खूनाची घटना घडल्यानं शहर हादरलं आहे. शहरात घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे.
सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचं दुकान आहे. शुभम कदम, सचिन माळवे हे त्यांच्या दुकानात गेले आणि त्यांना अंडी उधार देण्याची मागणी केली. पण, बबन यांनी अंडी उधार देण्यास नकार दिला.
बबन यांनी नकार दिल्याने हे दोघेही संतापले. त्यांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये बबन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की, यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल करत आहे.
“मागील तीन दिवसात शहरात झालेली खुनाची दुसरी घटना आहे. दोन्ही खुनातील संशयित आरोपी पकडले आहेत. अशा घटनांमुळे रात्री दहानंतर पेट्रोलिंग वाढवण्यात येईल. शहरात व जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने यंत्रणा सजग करत आहेत. शहरातील दोन्ही खुनाच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा तपास करण्यात येईल,” अशी माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.