एकल महिलेला स्वयंरोजगारासाठी रक्षाबंधननिमित्त मिळाली नाष्टा सेंटरची गाडी भेट
एकल महिलांना समाजात सन्मानाने उभे करण्यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे आदर्शवत काम : आ. संग्राम जगताप
अहमदनगर : राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनाने रक्षाबंधननिमित्त जयश्री हिंगे या लाडक्या बहिणीस नाष्टा सेंटरच्या गाडीची भेट देण्यात आली. एकल महिलेला आधार देण्यासाठी सावेडी येथे सुरु करण्यात आलेल्या नाष्टा सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीला एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी नाष्टा सेंटरच्या गाडीचे वाटप करण्यात आले होते. सावेडी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चव्हाण, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील, सचिन जगताप, ॲड. राजेंद्र वाबळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, एकल महिलांना समाजात सन्मानाने उभे करण्यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आदर्शवत काम करत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला भावाची साथ व भेट या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली आहे. या महिला समाजात एकल नसून, त्यांच्या मागे भाऊ सक्षमपणे उभे आहेत. समाजातील अशा बहिणींना स्वत:च्या पायावर उभे करुन पाठीराखा भाऊची भूमिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू महिलांच्या अडचणी सोडवित असताना एकल महिलांना आधार देण्याचे उपक्रम सुरु आहे. एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना शिलाई मशीन, नाष्टा गाडीचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. एकल महिला जयश्री हिंगे यांनी आमदार जगताप यांना राखी बांधली. शहरात रक्षाबंधन निमित्त झालेल्या या भावनिक कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.