सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य!
संगमनेरमध्ये तणाव : वाहनांची जाळपोळ, बॅनर फाडले
धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले. सभेनंतर वाहनांची तोडफोड करुन एक वाहन पेटवले गेले. विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. सभेनंतर महिला व्यासपीठावर गेल्या. तेथे महिलांनी ठिय्या मांडला. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या देशमुख यांना येथे बोलवावे. कारवाई करावी त्याशिवाय हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. सरपंच उज्ज्वला देशमाने, सुनीता शेटे, पूजा तोरकडी, सुरेखा तोरकडी, माया खताळ, मीना खताळ आदी आंदोलनात सहभागी आहेत. अकोले नाका परिसरात काही फलक फाडण्यात आले. तालुका पोलिस
स्टेशनला डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, अमर कतारी, सीताराम राऊत आदींसह रात्री उशिरा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. संगमनेर तालुक्यात तणाव आहे.