प्रोफेसर चौक येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.
पावसाने उपनगरातील 'मॉडेल रस्त्या' वर खड्डे व खडी.
प्रतिनिधी (ऋषिकेश राऊत)
प्रोफेसर चौक येथील रस्ता मॉडेल रस्ता म्हणून घोषित करण्यात आला होता. तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकापर्यंतचा रस्ता हा उपनगरातील एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आली होती व मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील झाडे काढण्यात आलेली आहेत.
अहमदनगर मध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाचे आगमन झाले होते. या पावसाने रस्त्यावरील खडी वर येऊन रस्त्यावर खड्डे झाले आहे. पाऊस यायच्या अगोदर पासूनच या रस्त्याचे काम बंद होते. या रस्त्यावर फक्त एकच थर दिलाय आणखी दोन थर बाकी आहेत. मात्र पहिल्याच पावसाने अंदाजे साडे तीन कोटी रुपये खर्चून तयार झालेला रस्ता वाहून जातोय की काय ? असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे.
निष्क्रिय ठेकेदारामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. नागरिकांना या रस्त्यावरून गाड्या चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी पहिल्याच पावसात पाण्यात गेला आहे. तरी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल ठेकेदाराला जबाबदार धरून योग्य ती कारवाई व्हावी अशी उपनगरातील नागरिकांची मागणी आहे.