समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य डॉ.गेल ऑम्व्हेट यांनी पुढे नेले -प्रा.डॉ. कॉ. महेबुब सय्यद

भाकप, मार्क्सवादी आणि डाव्या समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने डॉ.गेल ऑम्व्हेट यांना श्रध्दांजली

अहमदनगर (संस्कृती रासने )

 

डॉ.गेल ऑम्व्हेट या महात्मा फुलेंच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी सत्तरच्या दशकात भारतात आल्या. समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य त्यांनी जसे पुढे नेले, तसेच सर्वांनी काम केले पाहिजे. त्यांनी येथील बहुजनसमाजासह महिलांचे प्रश्‍न समजून घेतले. त्यांना वाटले की आता आपणही फुलेंची चळवळ पुढे नेली पाहिजे. त्यांनी सांगली हे मुळ कार्यक्षेत्र निवडले. त्याचबरोबर भारतीय स्त्रीमुक्ती च्या संदर्भात त्यांनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून पर्यायी धर्मसंस्कृतीचा विचार मांडला. विविध चळवळींचे प्रत्यक्ष नेतृत्व करत असतानाच बौध्दिक नेतृत्वही दिले असल्याचे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा.डॉ. कॉ. महेबुब सय्यद यांनी केले.

 

भाकपच्या पक्ष कार्यालयात डॉ.गेल ऑम्व्हेट यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  सय्यद बोलत होते. भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पीस फाऊंडेशनचे आर्किटेक्ट अर्शद शेख, हुसेन शेख, शहर सुधार समिती व भाकपचे भैरवनाथ वाकळे, सिटू, आयटक आणि कामगार संघटना महासंघाचे महादेव पालवे, बाळासाहेब सागडे, रावसाहेब कर्पे, अरूण थिटे, वैभव कदम, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, दिपक शिरसाठ आदी उपस्थित होते.

 

 

पुढे बोलताना प्रा.डॉ. कॉ. सय्यद म्हणाले की, चळवळीच्या निमित्ताने डॉ.गेल ऑम्व्हेट भारतभर फिरल्या, अभ्यास केला. त्यांचे कल्चरल रिव्होल्ट इन कलोनिअल सोसायटी, सिंकिंग बेगमपुरा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अन्डरस्टँडींग कास्ट, दलित अ‍ॅण्ड द डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन, न्यू सोशल मुव्हमेंट इन इंडिया इत्यादी ग्रंथ लिहले. चळवळ व साहित्य क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

भाकपचे राज्य सहसचिव कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, एखाद्या विषयाच्या मुळाशी जावून त्याचा अभ्यास कसा करायचा आणि निःपक्षपातीपणे विश्‍लेषण करत त्याचा उलगडा कसा करायचा? हे ऑम्व्हेट यांच्याकडून शिकण्यासारखे होते. ते चळवळी व संशोधनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी, कोल्हार, अहमदनगर शहर, नेवासा आदी विविध भागात येत होत्याचे सांगून, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थितांनी डॉ.गेल ऑम्व्हेट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या अभिवादनाच्या घोषणा दिल्या. आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.