भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांना निवेदन

अहमदनगर (संस्कृती रासने)

भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले.

 

 

पर्यटन राज्यमंत्री तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांची भेट घेऊन भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजित सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, प्रांजली सपकाळ आदी उपस्थित होते.

 

 

 

भिंगार हे शहराचे उपनगर म्हणून विकसीत झाले आहे. हा भाग छावणी हद्दीत असल्याने त्यावर केंद्रीय रक्षा मंत्रालयाचे नियंत्रण आहे. छावणी परिषदेच्या हद्दीत ऐतिहासिक भुईकोट किल्ला असून, त्याच्या सुशोभीकरणाचे काम सध्या बंद आहे. या किल्ल्यात भारताचे पहिले पंतप्रधान बंदिवासात असताना त्यांनी  डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. तसेच या किल्ल्यात मौलाना आझाद यांसारखे आनखी स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुष बंदिवान होते. त्यांचे बंदीवान गृह देखील असतित्वात आहे. हा किल्ला भव्य असून, त्याचे सुशोभीकरण करुन राष्ट्रीय स्मारक घोषित झाल्यास पर्यटन क्षेत्राला चालना मिळून भिंगार शहराचा विकास साधला जाणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रश्‍नी पाठपुरावा करुन  भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.