सप्तशृंगी गडावर तृतीय पंथीयाचा छबिना उत्सव उत्साहात संपन्न
कोजागिरी निमित्त दरवर्षी तृतीयपंथीयांची सप्तश्रंगी गडावर जत्रा असते. मध्यरात्रीच गड गजबजून जातो. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गडावर नवरात्रोत्सव झाला नाही. तसेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवदेखील होऊ शकला नाही. मात्र, तृतीयपंथीयांच्या यात्रेची म्हणजेच छबिन्याची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मोजक्या पंधरा जणांना गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली.
त्यानुसार भास्कर गुरू आणि पायल गुरु यांच्या नेतृत्वाखाली गडावर असलेल्या शिवालय तलावापासून देवी मंदिराच्या पायथ्यापर्यंत देवीच्या मूर्तीला नेण्यात आले. मंदिराच्या पायथ्याजवळ देवीची पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाचं संकट टळावं यासाठीही तृतीयपंथीयांकडून देवीला साकडं घालण्यात आलं.
तृतीयपंथीय गटाचे गुरु आखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगीरीजी यांच्या नेतृत्वात यावेळी मोजकेच सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिरे लवकरात लवकर खुली करावित अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. तसेच परंपरा खंडित होऊ नये म्हणून परवानगी दिल्याबद्दल तृतीयपंथीयांनी प्रशासनाचे आभार मानलेत.