औरंगाबाद :
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असल्याच मानलं जात आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला.
पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठवाड्यातील दोन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील चार उमेदवारांची घोषणा सोमवारी केली. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख ,नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे.