शिर्डीमध्ये विद्यार्थ्यांकडून बोगस मतदानाचा आरोप
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोणी येथे बोगस मतदान झाले आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी केला. घोगरे यंनी स्वतः मतदान केंद्रावर एका विद्यार्थिनीला अडवून तिला नाव व गाव विचारले. या वेळी त्या मुलीने धुळ्यातील असल्याचे सांगितले. दरम्यान, त्या मुलीने तेथून काढता पाय घेतला. लोणीत विद्यार्थ्यांकडून बोगस मतदान घडवून आणले, असा आरोप घोगरे यांनी केला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी घोगरे यांचे आरोप फेटाळले. विखे म्हणाल्या, समोरच्या व्यक्तींनी केलेला आरोप शंभर टक्के खोटा आहे. आपल्याकडे त्या वर्षानुवर्षे शिकत आहेत. त्या आपल्या महाविद्यालयातील मुली आहेत. त्यांचे दाखले असून त्या इथल्याच्या रहिवासी आहेत. मतदान करताना त्या माणसाची ओळख पटल्याशिवाय मतदान करता येत नाही. मतदान केंद्रात त्या मतदाराची ओळख पटल्याशिवाय मतदान करू देऊ शकत नाही. पण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आरोप करत असल्याचे ते म्हणाले.