कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन पुणे जिल्हयात मतदानाला  सुरुवात

पुणे :
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली. कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 
 
   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात मतदान केंद्र परिसरात प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.  सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या साहित्याचे कीट पुरविण्यात आले आहे.  मतदानासाठी येणा-या मतदारांमध्ये देखील सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेण्यात येत आहे.  तसेच केंद्रावर येणा-या मतदारांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
 
  मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व सहायकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे.