२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या
नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये नोकऱ्यांसाठी एकूण सात कोटी अर्ज प्राप्त झाले असून, त्यात महिलांची संख्या २.८ कोटी आहे. २०२३ च्या तुलनेत महिलांच्या श्रमशक्तीतील भागिदारींत २० टक्के वाढ झाली आहे. रोजगार पोर्टल ‘अपना डॉट कॉम’ ने जारी केलेल्या ‘इंडिया ॲट वर्क २०२४’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, यंदा नोकऱ्यांसाठी आलेल्या एकूण अर्जाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहे. वरिष्ठ आणि व्यवस्थापकीय पदांसाठी आलेल्या अर्जाची संख्या यंदा ३२ टक्के वाढली आहे. महिला आणि तरुणांची श्रमशक्तीतील भागीदारी वाढत असल्यामुळे यंदा नोकऱ्यांची मागणी वाढली आहे. अहवालानुसार, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि मुंबई यांसारख्या टिअर-१ शहरांत महिलांनी नोकरीसाठी सर्वाधिक १.५२ कोटी अर्ज केले. जयपूर, लखनौ आणि भोपाळ यांसारख्या टिअर-२ आणि टिअर-३ शहरांत महिलांचे १.२८ कोटी अर्ज आले.
◆ महिलांच्या वेतनात २८ टक्के वाढ
अहवालात म्हटले आहे की, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला नोकरदारांच्या सरासरी वेतनात २८ टक्के वाढ झाली आहे. आरोग्य देखभाल, आतिथ्य, किरकोळ विक्री आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांप्रमाणेच फील्ड विक्री, पुरवठा श्रृंखला आणि सुरक्षा सेवा यांसारख्या अपरंपरागत क्षेत्रांतही महिला आपले योगदान देत आहेत.