अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा खातरजमा व शहानिशा करुन नोंदवावा रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

निर्मलनगरच्या त्या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन, पैसे उकळण्यासाठी पुन्हा खोट्या तक्रारीचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणारे फिर्यादी समोरच्या त्रास देण्याच्या उद्देशाने व पैसे उकळण्याच्या हेतून वारंवार जातीय अत्याचार करत असल्याच्या खोट्या तक्रारी देत असून, पोलीसांनी संपूर्ण चौकशी करुन सदर व्यक्तीची खोटी तक्रार घेऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाई वाहतुक आघाडीचे संदीप वाघचौरे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विशाल भिंगारदिवे, विजय शिरसाठ, मुन्ना भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
निर्मलनगर येथे दोन कुटुंबातील वादानंतर सन 2020 मध्ये सावंत कुटुंबीयांवर समोरच्या फिर्यादीने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. एकमेकांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होऊन तपास पूर्ण झालेला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणारे फिर्यादीला शासकीय अनुदान देखील मिळालेले आहे. या प्रकरणातील फिर्यादी जाणीवपूर्वक सावंत कुटुंबीयांना या प्रकरणात पैसे उकळण्याच्या हेतूने त्रास देत आहेत. त्यामुळे तो व्यक्ती वारंवार पोलीस स्टेशनला जातीय अत्याचार होत असल्याच्या खोट्या तक्रारी देत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
पैसे उकळण्याच्या हेतूने काही संघटनांना हाताशी धरुन हा खोट्या तक्रारी देण्याचा प्रकार सुरु आहे. पोलीस प्रशासनाने या दबावाला बळी न पडता, तक्रारीची पूर्णत: खातरजमा व शहानिशा करुन कारवाई करावी व त्रास देण्याच्या हेतूने खोट्या तक्रारी करणार्‍यावर देखील कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.