आनंदऋषीजी हॉस्पिटल नुतनीकरण झालेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा शुभारंभ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांनी नुतनीकरण करण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा (बालरोग विभाग) लोकार्पण करण्यात आले. स्व.सौ. जतनबाई मानकचंदजी बोथरा परिवार व पारस ग्रुपच्या वतीने योगदानातून उभारलेल्या या विभागाचे उद्घाटन मिहान बोथरा या बालकाच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी प्रेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनिषा बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, प्रनेश बोथरा, रोनक बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, प्रसन्ना बोथरा, प्रणिला बोथरा, खुशबू बोथरा, समिक्षा बोथरा, श्रेया बोथरा, दर्शिका बोथरा, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, निखीलेंद्र लोढा, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, बालरोग तज्ज्ञ डॉ. वैभवी वंजारे, डॉ. सोनाली कणसे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात निखीलेंद्र लोढा म्हणाले की, उद्योग क्षेत्रात बोथरा परिवार उंच क्षितिज गाठत असताना, सामाजिक सेवेतही भरीव योगदान देत आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासून या परिवाराने आरोग्य सेवेच्या महायज्ञात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आर्थिक सहयोगाने उभे राहिलेले अद्यावत नवजात शिशु अतिदक्षता विभागाद्वारे गरजू घटकातील बालकांची सेवा घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेमराज बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्ययावत बालरोग विभागाच्या माध्यमातून नवजात बालकांची सेवा आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी बोथरा परिवाराचे योगदान निश्‍चितच महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्येच अद्यावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी हे वरदान ठरणार आहे. पहिले फेज पूर्ण करण्यात आले असून, दुसरे फेजचे काम देखील लवकर पूर्ण होणार आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य सुरू आहे. याच भावनेने व विश्‍वासाने हे अद्यावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सर्वसामान्यांना आधार ठरणार आहे. नवजात बालकांची सेवा घडत असताना भविष्यात कुपोषित बालक होऊ नये, यासाठी गर्भवती महिलांची तपासणी, उपचार व प्रसूतीपर्यंत काळजी आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बोथरा परिवाराला सेवेची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटलचे त्यांनी ऋण व्यक्त केले. तर ज्या गरजू रुग्णांकडे पैसे नाहीत, त्यांना या विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सतीश बोथरा यांनी जिल्ह्याला अद्यावत बालरोग विभागाची गरज होती. सर्वसामान्यांना ही खर्चिक सुविधा पेलवत नाही. या विभागात कमी दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणार असून, जनसामान्यांची सेवा घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नुतनीकरण झालेल्या 16 बेडच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे विविध उपकरणांचा समावेश आहे. कमी वजनाचे आणि कमी दिवसात जन्मलेल्या बाळांवरील इलाज, बाळाने पोटामध्ये शी केल्यास श्‍वासोच्छवासाच्या होण्यार्‍या त्रासावर उपचार, नवजात काविळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, बाल दमा, अनुवंशीक आजार व जन्मजात आजारावर निदान, एआरडीएस (श्‍वसन दाह), बालदमा तसेच लहान मुलांचे टू-डी इको, एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब 24 तास सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हे उपचार मोफत उपचार केले जाणार आहेत. मुलींना संपुर्ण बिलामध्ये 25 टक्के सवलत व कॅशलेश सुविधा उपलब्ध आहे.