केडगावला गुणवंत विद्यार्थी व बास्केटबॉल खेळाडूंचा सत्कार

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारे मुले जीवनात उच्च ध्येय गाठतात -मनोज कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल व केडगाव बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
नुकतेच दहावी बोर्डाचा निकाल लागला असून, त्यामध्ये ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. तर राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये केडगाव क्लबच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडला. नगरसेवक मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, अ‍ॅड. अनुराधा येवले, संभाजी पवार, उद्योजक जालिंदर कोतकर, मधुकर चिपाडे, बच्चन कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, सुमित लोंढे, संचालक भैरू कोतकर, रामदास ढवळे, तुषार कोतकर, नवनाथ कोतकर, प्रा. शाहरुख शेख, प्रशिक्षक छबुराव कोतकर, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांची संगत खूप महत्त्वाची असते. संगतीचा परिणाम जीवनावर होतो. आपण आपल्या मित्र-मैत्रिणी योग्य आहे की अयोग्य? याची खात्री करूनच त्यांच्याशी मैत्री करावी.बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास देखील महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
अ‍ॅड. अनुराधा येवले म्हणाल्या की, विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. मोबाईल आपले ज्ञान वाढविण्यासाठी अधिक चांगल्या पध्दतीने उपयोगी करुन घेता येऊ शकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. मुलांचे भविष्य उज्वल व्हावे हेच एकमेव स्वप्न घेऊन पालक त्यांना दिशा देत असतात. ज्या मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव राहते, तेच मुले जीवनात उच्च ध्येय गाठत असल्याचे त्यांनी सांगितले.