डॉ.ना. ज.पाउलबुधे विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप

विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन पालक व शाळेचे नाव मोठे करावे - सतीश ढवण

नगर – शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी फार महत्वाचा असतो. शाळासुरु होण्यापूर्वी आठ दिवसांपासून शाळेत जायची तयार होत असते. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत होत असल्याने सर्वांमध्ये पहिल्या दिवसाचा उत्साह असतो. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले असल्याने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन शाळेचे, त्याचबरोबर पालकांचे नाव उंचवावे. आधुनिक तंत्रज्ञानाचाही अभ्यासात उपयोग करावा, तसेच खेळासही प्रोत्साहन द्यावे. संस्थेच्या उपक्रमांना आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सतीश ढवण यांनी केले.

वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पाठपुस्तके वाटप करण्यात आले. याप्रसंगी सतीश ढवण, सागर ढवण, प्राचार्य भरत बिडवे, महादेव आमले, अर्चना कर्डिले, आशा गावडे आदिंसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

पुढे बोलतांना सतीश ढवण म्हणाले, ज्या शाळेत मी घडलो, त्या शाळेविषयी मला अभिमान आहे. त्यामुळेच शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्राचार्य भरत बिडवे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. क्रमिक अभ्यासबरोबरच विविध स्पर्धा, परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याने विद्यार्थीही विविध क्षेत्रात चमकत आहेत. याचा संस्थेला अभिमान आहे. शासनाच्यावतीने मोफत पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी मिळल्याने अभ्यासक्रम लगेच सुरु होण्यास सुलभ होणार आहे. माजी विद्यार्थ्यांही शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होत, होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतात. असे चांगले संस्कार शाळेने दिले असल्याचे सांगितले.

यावेळी सतीश ढवण यांच्यावतीने वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कर्डिले यांनी केले तर आभार महादेव आमले यांनी मानले. पहिल्याच दिवशी पुस्तके, वह्या, पेन मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.