डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती

गरुड कॅन्सर सेंटर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद कॅन्सरची भिती न बाळगता त्याची जागृती होणे आवश्यक -दिलीप सातपुते

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सावेडी येथील गरुड कॅन्सर सेंटर येथे घेण्यात आलेल्या मोफत कॅन्सर तपासणी, मार्गदर्शन शिबिरात कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात आली. या शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 15 जून दरम्यान शहरात विविध मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर सुरु असून, या पार्श्‍वभूमीवर कॅन्सर तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रकाश गरुड, स्त्री रोग कॅन्सर तज्ञ डॉ. पद्मजा गरुड आदींसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, कॅन्सरची भिती न बाळगता त्याची जागृती होणे आवश्यक आहे. अनेक रुग्ण वेळीच उपचार घेऊन बरे झाले आहेत. आजाराशी लढण्याची मानसिकता असल्यास तो व्यक्ती कॅन्सर सारख्या आजारावर देखील मात करु शकतो. मात्र वेळोवेळी तपासण्या व उपचार रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोणताही गंभीर आजार उद्भवल्यास त्याच्या खर्चाची चिंता न करता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले.
अनिल शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे ऑनलाईन फाईल अपडेट झाल्यानंतर अवघ्या 48 तासात आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. पहिल्यांदाच राज्यात असे घडत असून, गरजू रुग्णांना तातडीची मदत मिळत आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात मदतीच्या फाईली प्रलंबीत होत्या. विकास व सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने गतीमान सरकार सत्तेवर असल्याचे या कामातून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश गरुड म्हणाले की, कॅन्सरने घाबरण्याची गरज नसून, योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्यक आहे. कॅन्सर प्रथम अवस्थेत तपासल्यास रुग्ण बरे होतात. मात्र याकडे दुर्लक्ष करणारे मृत्यूकडे ओढले जातात. हा आजार संसर्गजन्य नसून, लाईफस्टाईलमुळे निर्माण होणारा आजार असल्याचे ते म्हणाले. तर या शिबिरात कॅन्सरची कारणे, लक्षणे व हा आजार टाळण्यासाठी घेण्यात येणारी काळजीबद्दल डॉ. गरुड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी रुग्णांची केमोथेरपी देखील करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत चंद्रकांत (काका) शेळके यांनी मानले. आभार अनिकेत कराळे यांनी मानले.