नायगावच्या मुस्लिम समाजाचे कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना, प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील मुस्लिम समाजाने कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना करणार्‍या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
नायगाव (ता. जामखेड) येथे मुस्लिम समाजाच्या मालकीची मस्जिद व कब्रस्तानची जागा आहे. या जागेत एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. तसेच पूर्वजांची कबर जेसीबीने उकरून त्यावर मुरूम पसरविला असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी यांनी सदर जागेची पाहणी करून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ग्रामपंचायत रेकॉर्डप्रमाणे सदर जागा मुस्लिम समाजाची असल्याची सातबारावर जुनी नोंद आहे. पुरावे असताना देखील कोणताही अधिकारी सहकार्य करत नाही, उलट अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे स्पष्ट करुन मुस्लिम समाजाने जामखेड पंचायत समिती कार्यालया समोर 5 जुलै रोजी कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.