पंडित नेहरू हिंदी विद्यालयात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुशासन व संस्काराने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जाणार -किशोर मुनोत

अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला मैदान येथील राष्ट्रभाषा शिक्षा मंडलद्वारा संचलित पंडित नेहरू हिंदी विद्यालयात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धीवर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका उज्वला आदिक, बाबासाहेब बोडखे, कमल भोसले, गोपीचंद परदेशी, अंजली मिश्रा, सुदेश छजलाने, कविता जोशी, विनीत थोरात, वैभव शिंदे, शिल्पा पाटोळे, मोनिका मेहतानी, ज्योती वाघेला, ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिव किशोर मुनोत म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थिनी मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा. मोबाईलचा वापर कसा करायचा? हे स्वतःच्या बौद्धिक क्षमतेशी निगडित आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे मार्गक्रमण करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुशासन व संस्काराने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक सुहास धीवर म्हणाले की, देशातील कानाकोपर्‍यातून आलेल्या बहुभाषिक वर्गाला हिंदीतून अद्यावत शिक्षण शाळेच्या माध्यमातून दिले जात आहे. विद्यार्थ्यांची प्रगती ही फक्त शैक्षणिक नसून, त्यांचा सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे. यासाठी शाळेत कला, क्रीडांना देखील प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल भोसले यांनी केले. आभार कविता जोशी यांनी मानले.