पाचेगावला पुन्हा चर्चमध्ये घुसून त्या व्यक्तीचा प्रार्थनेला विरोध

गावातील शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन भाविकांना प्रार्थनेसाठी चर्च खुले करुन देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून प्रार्थनेला अडकाठी आणणार्‍या व चर्चमध्ये येणार्‍या भाविकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍यावर कारवाई करुन त्याला तात्काळ चर्चच्या बाहेर काढून भाविकांना चर्च प्रार्थनेसाठी खुले करुन देण्याची मागणी पाचेगाव (ता. नेवासा) येथील एका ख्रिश्‍चन समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. चर्च भाविकांना प्रार्थनेसाठी खुले न झाल्यास पाचेगाव ग्रामपंचायत कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय समोर प्रभूची प्रार्थना करुन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाचेगाव (ता. नेवासा) येथे एक जुना सार्वजनिक चर्च आहे. ही जागा ग्रामपंचायत पाचेगावच्या नावाने आहे. गावातील एका गृहस्थाने यापूर्वी देखील आपल्या कुटुंबासमवेत त्या चर्चच्या जागेत अतिक्रमण करुन प्रार्थनेचा कार्यक्रम बंद केला होता. त्यावेळी देखील उपोषण केल्यानंतर सदर व्यक्तीला चर्चमधून पोलीस प्रशासनाने बाहेर काढले. मात्र पुन्हा त्या व्यक्तीने चर्च मध्ये घुसून प्रार्थनेचा कार्यक्रम बंद पाडला आहे. प्रार्थनेसाठी जाण्याचा प्रयत्न केल्यास तो व्यक्ती महिलांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. इतर समाजातील काही ग्रामस्थांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावर देखील अ‍ॅट्रॉसिटाचा गुन्हा दाखल करण्यास तो धमकावत आहे. सदर व्यक्तीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्याच्यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
चर्चमध्ये प्रार्थनेला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला जाब विचारल्यास तो जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर व्यक्ती धार्मिक भावनेशी खेळत असून, त्याच्यावर कारवाई करुन त्याला त्वरीत चर्च मधून बाहेर काढावे व चर्च प्रार्थनेसाठी खुला करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी कडूबाई देठे, चिलिया गोरक्ष तुवर, शालिनी देठे, बाबासाहेब देठे, सिमोन देठे, विशाल देठे, सरसाबाई देठे, अनिल देठे, शितल देठे आदी उपस्थित होते.