पारनेरसह तालुक्याच्या दक्षिण भागात कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपिटेने या परिसरातील शेती उध्वस्त झाली आहे.कांदा,ऊस,ज्वारी,चारापिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. जनावरांचे निवारे गोठ्यावरील पत्रे उडाल्याने पशुपालकांचेही मोठे नुकसान झाले.जनावरे उघड्यावर आली आहेत.अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने तालुक्याच्या मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला.अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.दरम्यान आमदार निलेश लंके यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.पारनेरसह तालुक्यातील निघोज,जवळे,राळेगण,थेरपाळ गुणवरे सांगवी,सूर्या,वडझिरे,पठारवाडी, लोणी,मावळा या कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांसह करंदी,चिंचोली,वडनेर,हवेली,हंगा,
चिंचोली,पिंपळनेर,गांजी,भोयरे,जातेगाव,सुलतानपूर,गटेवाडी आदी गावांमध्ये दुपारी चारच्या सुमारास वादळीवाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळेतच गारपीट सुरू झाली.