पिरेवाडी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

नगर – विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य
व मिष्ठान्न भोजन देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक
अंकुश आघाव, मुख्याध्यापक पी.डी.पवार, शिक्षक मोहनराव शिरसाठ, अ‍ॅड. अर्जुन
काळे, प्रभाकर आघाव, बुर्‍हाण शेख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अंकुश आघाव म्हणाले, शासनाच्यावतीने सर्व मुलांना शिक्षणाच्या
प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असते. हा विचार
करुन विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न
केला जात आहे. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांचे
स्वागत करुन त्यांना वह्या, गणवेश आदिंसह शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यापुढील काळातही अशा मुलांसाठी संस्था कार्यरत राहील, असे सांगितले.
या शाळा प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात
स्वागत करण्यात आले. त्यांना पुष्पगुच्छ आणि पाठ्यपुस्तक गणवेश देऊन प्रवेशित
करण्यात आले. वर्ग प्रवेशद्वारास आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सजवण्यात
आले. शाळेतील सर्व मुलांना मध्यान्ह भोजन त्यांच्या आवडीचे लापशी वरण भात हे
गोड जेवण देण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक पी.डी.पवार म्हणाले, शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना
अनेक सुविधा देण्यात येत आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे.
त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या इतर शैक्षणिक गरजा पूर्ण
होत आहेत. विश्व सत्यशोधक संस्थेने राबविला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे
सांगितले.