भिंगार येथील नवीन मराठी शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

हमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील नवीन मराठी शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्गांना आंब्याचे तोरण, शाळेच्या  आवारात रांगोळी सडा टाकून प्रवेशद्वार फुग्यांनी सजविण्यात आला होते. विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
सर्वशिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर, शाळा समिती सदस्य संजय सपकाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.
नंदकुमार झंवर यांनी प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे. पाया भक्कम झाल्यास विद्यार्थी आपले ध्येय गाठू शकतात. या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कराळे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक मुसा सय्यद यांनी मानले.