भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात योग दिवस साजरा

क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व प्रगती फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- योगा हे शरीर, मन, आत्मा आणि विश्‍व एकत्र करते. योग ही समृद्ध जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. मन आणि शरीरावर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी जगभरात योग नित्य नियमाने केला जात असल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी, प्रगती फाउंडेशनच्या वतीने गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योग शिबिराप्रसंगी अ‍ॅड. शिंदे बोलत होते. यावेळी प्रगती फाउंडेशनचे अध्यक्षा अश्‍विनी वाघ, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, जय युवाच्या जयश्री शिंदे, राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे, वसतिगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव, पोपट बनकर, रावसाहेब काळे, आनंद वाघ आदी उपस्थित होते.
प्रारंभी योगाच्या जनजागृतीसाठी परिसरातून मुलींनी प्रभात फेरी काढली. त्यानंतर योग प्रशिक्षिका अश्‍विनी वाघ यांनी योगाचे प्रात्यक्षिकासह मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी अश्‍विनी वाघ म्हणाल्या की, योग ही एक कला आहे. तसेच योग एक शास्त्र आहे. योग मुख्यत्वे प्राणायामाद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. अनेक आजारांवर मात करण्यासाठी योगासन खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे. नियमितपणे योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती शिंदे यांनी केले. आभार रजनी जाधव यांनी मानले.