यंदा ज्येष्ठांना विठोबाचे दर्शन होणार मोफत

अहमदनगर: यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय म्हणून दरवर्षी एसटी महामंडळातर्फे जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही अहमदनगर विभागाच्या वतीने प्रत्येक डेपोतून जादा गाड्यांचे नियोजन झालेले आहे. सुमारे 250 ते 300 ज्यादा गाड्या पंढरपूर यात्रेसाठी नगर जिल्ह्यातून जाणार आहेत. शासनाने घेतलेल्या योजनेनुसार 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना 50% सवलत प्रवासात मिळणार आहे. पंढरपूर यात्रेमुळे एसटी महामंडळाला कोट्यावधींचे आर्थिक उत्पन्न मिळत असते, परंतु मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षात पंढरपूरची यात्रा झाली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यावधींचे उत्पन्न बुडाले. मागील वर्षीही नगर विभागातून 300 जादा बस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. यंदाही 250 ते 300 गाड्यांचे नियोजन आहे. भाविकासाठी नगर शहरातील ताराकपूर बसस्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. 25 जून ते 4 जुलै पर्यंत या जादा गाड्या पंढरपूरकडे रवाना होतील. शासनाने 75 पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवासाची सोय 2023 पासून केली आहे. ही सोय पंढरपूर यात्रेसाठीही असल्यामुळे या भाविकांना मोफत पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची यंदाची पंढरीची वारी मोफत होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वच महिलांना तिकिटात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने मार्चमध्ये घेतला. त्यामुळे सध्या राज्यात महिलांनी कोठेही प्रवास केला, तरी तिकिटात 50 टक्के सूट आहे. आणि ही सूट पंढरपूर जादा गाड्यांमध्येही असणार आहे.