शहरातील जदीद उर्दू प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम -साहेबान जहागीरदार

अहमदनगर (प्रतिनिधी)- माणिक चौक येथील एटीयू संस्थेच्या जदीद उर्दू प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी यांच्या पुढाकाराने साहेबान जहागिरदार व सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांचे प्रारंभी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी, संस्थेचे चेअरमन मतीन सय्यद, व्हाईस चेअरमन असगर सय्यद, सचिव तन्वीर चांद, माजी नगरसेवक सादिक शेख, नसीर अब्दुल्ला शेख, मौलाना शफीक कासमी, तन्वीर शेख, समीर बेग, गुलाम दस्तगीर, अजगर पटवा, मुजफ्फर कुरैशी, रबनवाज सुभेदार, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, अकील शेख, रियाज शेख, मुख्याध्यापक नासिर खान, अन्वर शेख आदी उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम असून, शिक्षणाने समाजाची प्रगती साधली जाणार आहे. अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. एटीयू या शैक्षणिक संस्थेने शहरातील अल्पसंख्यांक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुजाहिद कुरेशी म्हणाले की, लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजात शिक्षणाबद्दलची जागृती होणे आवश्यक आहे. शिक्षण फक्त नोकरीपुरते मर्यादीत न राहता शिक्षणाचे चांगले नागरिक घडत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन मतीन सय्यद यांनी जीवनात चमकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन आभार मानले.