शहरातील प्राणी हक्क कार्यकर्त्यांचे अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट विधेयकाला विरोध

अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट विधेयक प्राण्यांना अत्यंत पीडा पोचवणारे ठरेल -दर्शना मुझुमदार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिल्लीगेट वेस समोर प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिल 2023 ला विरोध दर्शविला. यावेळी जिवंत प्राण्यांच्या निर्यातीच्या गंभीर परिणामांबद्दल जनजागृती करुन या विधयकाला मंजूरी मिळू नये, यासाठी नागरिकांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राणी हक्क कार्यकर्त्या दर्शना मुझुमदार, अनिल कटारिया आदींसह नागरिक उपस्थित होते.
दर्शना मुझुमदार म्हणाल्या की, अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिल हे विधेयक पशुधन श्रेणी अंतर्गत जिवंत प्राण्यांची आयात आणि इतर देशांतून निर्यात करण्यास परवानगी देते. जहाज, विमान आणि इतर वाहनांमधून जिवंत प्राण्यांची इतर देशांमध्ये वाहतूक करणे प्राण्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते, कारण हे त्यांना एक वस्तू म्हणून वागवण्यासारखेच आहे. लांब आणि खडतर प्रवासादरम्यान या प्राण्यांना दु:ख आणि त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे अनेकदा त्यांना दुखापत, गंभीर आजार आणि मृत्यू देखील होतो. जर हे विधेयक मंजूर झाले तर हे विधेयक प्राण्यांना अत्यंत पीडा पोचवणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
अनिल कटारिया यांनी मनुष्यांप्रमाणेच इतर सर्व प्राणीही दया, आदर आणि सन्मानाने वागण्यास पात्र आहेत. पशु- क्रूरता आपली संस्कृती नाही. या विधेयका विरोधात असंख्य प्राणीप्रेमी व्यक्ती व कल्याणकारी संस्था एकजुटीने उभे आहेत. ज्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची निकड ओळखली आहे. जैन समाजाने या विधेयकाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समाजाचे प्रमुख नेते या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.