लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत विद्यार्थ्यांची केली धमाल सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात फुलांचा वर्षाव व मुलांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उंटाची सैर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.15 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात फुलांचा वर्षाव व मुलांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तर यावेळी खास आकर्षण ठरलेल्या उंटावर स्वारी करुन विद्यार्थ्यांनी धमाल केली. शाळेत एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडूळे, अर्जुन पोकळे, उत्तर विभागाचे निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकचे प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी राबविण्यात येणार्‍या  विविध उपक्रमाची माहिती देऊन शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी आकाशात फुगे सोडून शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. उपस्थित पाहुण्यांनी शाळेत राबविण्यात येणारी प्रत्यक्ष अध्ययन पध्दती, हसत-खेळत अद्यावत शिक्षण सर्वोत्तम ठरत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले.