श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांची बग्गीतून सफर

लेझीमचा डाव व ढोल पथकाच्या निनादात शालेय परिसरात रंगली प्रवेशोत्सव रॅली विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची बग्गीतून सफर घडविण्यात आली. लेझीमचा डाव व ढोल पथकाच्या निनादात शालेय परिसरातून प्रवेशोत्सव रॅली काढण्यात आली होती. प्रारंभी पद्मशाली विद्या प्रसासरक समाज सस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज दुलम, विश्‍वस्त राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, हाऊसिंग सोसायटीचे सचिव शंकर येमूल, मुख्याध्यापिका विद्या दगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे रमा औटी, विद्या एक्कलदेवी, मोनाली खंडागळे, रमा कैरमकोंडा, इंदू विश्‍वकर्मा, अर्चना गायकवाड आदींसह शालेय शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्गात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तर  उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. श्रमिकनगर परिसरात शिक्षकांनी गृहभेटीचा उपक्रम उत्तमपणे राबविल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती. तर नवीन विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेऊन शाळेत हजेरी लावली होती. संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.