समता परिषद, नंदनवन मित्र मंडळ व शिवसेनेने केला दहावी बारावीच्या गुणवंतांचा गौरव

आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य -सुवर्णाताई जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नंदनवन मित्र मंडळ व शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने दहावी व बारावी बोर्डाच्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. नंदनवन लॉन येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रभाग क्रमांक 15 मधील तब्बल अडीचशेपेक्षा जास्त गुणवंतांचा सत्कार पार पडला.
माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रशांत गायकवाड, पुंडलिक गदादे, अ‍ॅड. भाऊसाहेब लुणे, राजेंद्र काळे, बापूजी शिंदे आदी उपस्थित होते.
नगरसेविका सुवर्णाताई जाधव म्हणाल्या की, आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य घडविणार आहे. देशाचा विकास शिक्षणावर अवलंबून असून, विद्यार्थी उच्च शिक्षित झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या हातात आलेले मोबाईल हे एका शस्त्रासारखे असून, त्याने स्वत:चा घात किंवा विकास साधला होऊ शकतो. मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टी व ज्ञानार्जनासाठी केल्यास ज्ञानात निश्‍चित भर पडणार आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नव-नवीन क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे. स्पर्धामय युगात विविध क्षेत्राच्या वाटा विस्तारल्या गेल्या आहेत. पारंपारिक दिशेने न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आई-वडील व गुरुजनांचा आदर करा व ध्येय ठेऊन वाटचाल करण्याचे सांगितले. उपमहापौर गणेश भोसले व संभाजी कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उच्च शिक्षणाने स्वत:चे व शहराचे नांव उंचावण्याचे सांगितले.
दत्ता जाधव म्हणाले की, शालेय जीवनातूनच उज्वल भविष्याचा पाया रचला जातो. शिक्षणाने परिवर्तन घडत असते. उच्च शिक्षण घेऊन विविध पदाच्या माध्यमातून सशक्त भारतासाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नंदनवन मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव, गोरख आबनावे, प्रतीक भुजबळ, आदेश जाधव, विशाल जाधव, विकास सपाटे, निर्मल साठे, अभिषेक दळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापाड यांनी केले. आभार अ‍ॅड. लुणे यांनी मानले.