निमगाव वाघा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन

गावातील जलस्त्रोत सक्षम झाल्यास गाव पाणीदार होण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी दूध डेअरीचे चेअरमन अण्णा जाधव, डॉ. विजय जाधव, भरत बोडखे, वसंत कर्डिले, जलसंधारण अधिकारी मुक्ताजी शेळके, कॉन्ट्रॅक्टर राम वाळके, बंटी जाधव, प्रमोद जाधव, गणेश वाबळे, अतुल जाधव, पंकज वाबळे, योगेश जाधव, संतोष फलके, प्रवीण वाबळे, पिंटू वैराळ आदी उपस्थित होते.
गावातील पाझर तलाव क्रमांक एक मध्ये मोठी गळती असल्याने पाणी साठवण क्षमता घटली होती. पावसाचे अडविलेले पाणी अधिक काळावधी पर्यंत थांबत नव्हते. गावातील हा सर्वात मोठा पाझर तलाव असून, शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावातील जलस्त्रोत सक्षम झाल्यास गाव पाणीदार होण्यास मदत होणार आहे. पाणीदार बनलेल्या गावाचा विकास झपाट्याने साधला जाणार आहे. तर पाझर तलावाचा फायदा गावातील शेतकर्‍यांना निश्‍चितच होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जलसंधारण अधिकारी मुक्ताजी शेळके यांनी गावातील पाझर तलावांचे पुनरुज्जीवन झाल्यास  गावे सुजलाम सुफलाम होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील विहिरींना होणार असून, गाव टँकरमुक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.