निमगाव वाघा येथील मंदा डोंगरे व करिष्मा शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाना डोंगरे व करिष्मा असलम शेख यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, लता फलके, उज्वला कापसे, संजय कापसे, दीपक गायकवाड, पै. नाना डोंगरे, किरण जाधव, डॉ. विजय जाधव, दीपक जाधव, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन गेल्यास पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा मिळणार आहे. ज्या काळात महिलांना समाजात स्थान नव्हते, अशा परिस्थितीमध्ये मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींच्या रुपाने नेतृत्व उभे केले. आपल्या घरातील माता-भगिनींना उंबरठ्याबाहेर घेऊन येऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास खर्‍या अर्थाने अहिल्यादेवींना अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
मंदा डोंगरे यांना यापूर्वी विविध सामाजिक कार्याबद्दल शासनाचा आदर्श युवती पुरस्कार मिळालेला आहे. त्या डोंगरे सामाजिक संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सचिव असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नाने डोंगरे संस्थेला शासनाचा स्वच्छता हीच सेवा हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर करिष्मा शेख या देखील सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत असून, शैक्षणिक व विविध क्षेत्रात त्यांचा सातत्याने सहभाग आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.