महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन 

इतिहासतज्ज्ञ जेष्ठ शिवचरित्रकार हरपला

 महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या शिवशाहिरीच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला होता.
मराठे शाहीचा जाज्वल्य इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान चरित्र आणि इतिहासाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित  केलेले जाणता राजा हे महानाट्य खूपच गाजले होते . वयाची शंभरी पार करतांना त्यांनी विविध वृत्तवाहिन्या तसेच वेब पोर्टल आणि वृत्तपात्रांना मोठ्या उत्साहात मुलाखती दिल्या होत्या. मात्र दुसऱ्याची दिवशी सकाळी त्यांना भोवळ आली आणि त्यांचा तोल गेला. जमिनीवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दिनांक २६ ऑक्टॉबर रोजी हा अपघात घडला होता. त्यानंतर ते उठलेच नाहीत. त्यांच्या निधनाने शिवप्रेमी आणि महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असून त्यांचे मूळ   गाव पुणे जिल्ह्यातील सासवड आहे .

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होते . या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते . तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये होती .

बाबासाहेबांच्या पत्नी निर्मला पुरंदरे या त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनाही पुण्यभूषण हा किताब मिळाला होता. बाबासाहेबांची कन्या माधुरी पुरंदरे या एक गायिका-लेखिका आहेत.

पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत..

ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत.

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.

पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.