एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट

दोन हजार कामगारांची डेपो वापसी ; ३६ लालपरी पुन्हा मार्गस्थ

संपूर्ण दिवाळीत संपावर ठाम राहिलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर १६ दिवसांनंतर फूट पडली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल दोन हजार कामगार एस टी आगारात परतले. मोठ्या संख्येने कामगार कामावर परतू लागताच शुक्रवारी एकूण १६ डेपो मधून ३६ लाल परी ८०० हून अधिक प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्या. त्यामुळे राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी च्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी च्या शेकडो कामगारांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले असून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांत विरोधकांमध्ये दिलासा मिळाला आहे.

 

 

 

 

 

 

 

एस टी च्या शेकडो कामगारांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले असून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांत विरोधकांमध्ये जो आक्रमकपणा दिसत होता, तो शुक्रवारी दिसला नाही. याउलट महामंडळाने कामगारांविरोधात निलंबनाची कारवाई करत न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्रिसदस्यीय समितीची ढाल पुढे करत महामंडळाने संप मागे घेण्याबाबत ताठर भूमिका घेतल्याने आंदोलनाची धार बोथट होऊ लागली आहे. सर्वच संघटनांना बगल देणाऱ्या कामगारांचे आंदोलन दिशाहीन झालेले असून राजकीय नेत्यांकडूनही कामगारांना म्हणावा तितका दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. परिणामी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होण्याच्या कामगारांच्या आशेवर आता विरजण पडू लागले आहे. याचाच परिणाम म्हणून ९७ हजार २०० कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार कामगार शुक्रवारी कामावर परतले.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

कामगारांना संरक्षण : चन्ने :
मुंबई सेंट्रल डेपोमधून सातारासाठी दुपारी अडीच वाजता पहिली बस पोलिस बंदोबस्तात रवाना झाली. मुंबई सेंट्रल डेपोला पोलिस छावणीचे रूप आले होते. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कामावर परतणाऱ्या कामगारांना पोलिस संरक्षण देण्याची ग्वाही दिली. शेखर चन्ने म्हणाले की, एसटी महामंडळातील कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन करत आहोत. त्याला कामगारांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामगारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांना डेपोबाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. एसटीच्या डेपोमधील विश्रामगृहापासून ठिय्या आंदोलनासाठी बांधलेले मंडप खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत. परिणामी पुढील चार दिवसांत मोठ्या प्रमाणात कामगार निर्धास्तपणे कामावर परततील, अशी अपेक्षा आहे. पहिल्याच दिवशी दोन हजारांहून अधिक कामगार डेपोमध्ये परतले असून त्यात यांत्रिक कामगारांची संख्या अधिक आहे. चालक आणि वाहक ज्या संख्येने येत आहेत, त्याच प्रमाणात बसेस डेपोमधून सुटत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी डेपोमधून सव्वादोन हजारांहून अधिक खासगी वाहनांच्या मदतीने प्रवाशांची टप्पा वाहतूक सुरू आहे. उच्च न्यायालयात संपाबाबत अवमान याचिका दाखल असून सोमवारी त्यावर सुनावणी आहे. तोपर्यंत परिस्थिती आणखी सुधारेल, असा विश्वासही चन्ने यांनी व्यक्त केला.
इतक्यात ‘मेस्मा’ची कारवाई नाही: कामगारांवर होणाऱ्या कारवाईबाबत विचारणा केली असता, ‘मेस्मा’सारख्या कायद्याचा वापर करून कर्मचाऱ्यांविरोधात इतक्यात कारवाई करणार नसल्याचे शेखर चन्त्रे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आंदोलनामध्ये १३ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर कामगारांना आवाहन केले जात होते. अखेर महामंडळाने ९ नोव्हेंबरपासून कारवाईस सुरुवात केली आहे. कामगारांच्या बेकायदेशीर संपामुळे महामंडळाचे तब्बल १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामंडळाचे आणखी नुकसान न करता कामगारांनी कामावर परतण्याची गरज आहे. कामगार हे महामंडळाचेच असून त्यांना आणखी एक संधी दिली जात असल्याने इतक्यात ‘मेस्मा’ सारखी कारवाई करणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

स्थानिक परिवहन यंत्रणांची मदत:  प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील बेस्ट, पीएमपीएल अशा स्थानिक परिवहन यंत्रणांची मदत घेत असल्याचे महामंडळाने सांगितले. अतिरिक्त बसेसच्या माध्यमातून स्थानिक परिवहन संस्थांना प्रवासी वाहतुकीचा भार हलका करण्याचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय परिवहन आयुक्तांच्या मदतीने अधिकाधिक खासगी बसेसच्या माध्यमातून लाखो प्रवाशांची प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.