विधवा महिलांसाठी सन्मान कायदा करावा

बेबीताई गायकवाड यांचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन ; एकल महिलांना ‘स्वयंसिद्धा’ संबोधावे

नगर – अनिष्ठ रुढी-परंपरा बंद करुन विधवा महिलांसाठी सन्मान कायदा करावा या मागणीचे निवेदन स्वयंसिद्धा फाऊंडेशनच्या अध्यक्ष बेबीताई गायकवाड यांनी महिला व बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई येथे देण्यात आले.

     आज 21 व्या शतकात वावरत असतांना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलीत असल्याचे दिसून येत आहे. पतीच्या  निधनानंतर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जातात. यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीच्या निधनानंतर महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होऊ दिले जात नाही. तरी या अनिष्ट रुढी, प्रथा बंद करण्याबाबत कायदा व्हावा व या महिलांना सन्मान मिळवून द्यावा.

     कोरोना काळात अनेक 25 ते 35 वयोगटातील तरुण महिला विधवा झाल्या आहेत. त्यांनी हार न मानता कुटूंबासाठी पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्यासाठी पेन्शन, उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य, अनुदान देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.