सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त १८ जूनला विशेष संगीत सभेचे आयोजन
नगर – जिल्ह्याच्या संगीत क्षेत्रात भरीव योगदान देत अभिजात भारतीय संगीताचा वारसा व सामाजिक सौहार्दता जोपासण्याऱ्या सरगमप्रेमी मित्र मंडळ या संस्थेने स्थापनेचे ४५ वर्ष पूर्ण केले आहेत. संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.१८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘४५ वा वर्धापनदिन संगीत सभा २०२३’ या विशेष संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नगरच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हॉलमध्ये ही संगीत सभा होणार आहे, अशी माहिती सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष राम शिंदे यांनी दिली.
सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या या विशेष संगीत सभेत प्रा.अभिजित अपस्तंभ व सौ.मानसी अपस्तंभ या प्रसिद्ध उभयता गायकांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायन होणार आहे. यावेळी नगरचे मकरंद खरवंडीकर हे संवादिनीची व प्रसाद सुवर्णपाठकी हे तबल्याची साथसंगत करणार आहेत.
सांगीतिक क्षेत्रात काम करताना सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक जाणीव ठेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान केला जातो. या वर्षी चा पुरस्कार जागरुक नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुहासभाई मुळे यांना त्यांच्या सांगीतिक, सामाजिक, साहित्यिक, कला आणि अन्य वैविध्यपूर्ण योगदानाबद्दल प्रदान करून “सरगम सन्मानाने” सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे अ.भा.गांधर्व मंडळाचे रजिस्ट्रार श्री.विश्वास जाधव यांना अखिल भारतीय पातळीवरील मानाaच्या अशा ”भारतरत्न पंडित भीमसेन जोशी” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले असून अहमदनगर जिल्ह्याला हा सन्मान प्रथमच मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे, अ.ए.सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं.बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही विशेष संगीत सभा सरगमच्या सर्व सभासदांसाठी त्याचबरोबर संगीत साधक आणि रसिक नागरिकांसाठी खुली असून ही संगीत सभा सायंकाळी ६ वाजता वेळेवर सुरु होईल. जास्तीत जास्त रसिक नगरकरांनी या मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.