सिद्धीबाग जलतरण तलावाचे ‘स्व.धर्मवीर मा.आ.अनिलभैय्या राठोड जलतरण तलाव’ नामकरण

भविष्यात राष्ट्रीय जलतरणपटू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार - महापौर रोहिणी शेंडगे

 नगर – नगर शहराच्या विकासात स्व.अनिलभैय्या राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे दीर्घकाळ आमदार, मंत्री म्हणून नगर शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. जनसामान्याचे नेतृत्व करत लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला. त्यांच्या कार्याची आठवण भावी पिढी राहवी यासाठी जलतरण तलावास त्यांचे नाव देण्यात आले आहे. पुढील काळात या तलावाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्या ठिकाणी योगा हॉल, मिडिटेशन, इनडोअर व्यायाम, महिलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था तसेच तलावाची लांबी वाढविण्यात येणार आहे. या आधुनिक तलावात सराव करुन भविष्यात राष्ट्रीय जलतरणपटू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या माध्यमातून स्व.अनिलभैय्या राठोड यांचे व नगरचे नाव देशपातळीवर नेले जाईल, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.

     अहमदनगर महानगरपालिकेच्या सिद्धीबाग येथील जलतरण तलावाचे ‘स्व.धर्मवीर मा.आ.अनिलभैय्या राठोड जलतरण तलाव’ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे, शिवसेना (ठाकरे गट), स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेविका सुरेखा कदम, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे,  जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, आशाताई निंबाळकर, अरुणाताई गोयल, संचालक गणेश कुलकर्णी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी गणेश कवडे म्हणाले, नगर शहर आणि अनिलभैय्या राठोड हे समिकरण होते. त्यांच्या नेतृत्व जनसामान्याचे नेतृत्व होते. शहराच्या विकासातील त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. जलतरण तलावास ‘स्व.अनिलभैय्या राठोड’ नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, स्व.अनिल राठोड यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने नगर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यांच्या मुशीतून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते तयार झाले. समाजकार्याला प्राध्यन देत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. मनपाच्या जलतरण तलावास स्व.अनिलभैय्या राठोड यांचे नाव देण्यात यावी, ही मागणी लावून धरली व आज या तलावाचे नामकरण होत आहे, याचे मोठे समाधान आहे.

     याप्रसंगी राजेंद्र दळवी, संजय शेंडगे आदिंनीही स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्तविकात गणेश कुलकर्णी म्हणाले, मनपाच्या या जलतरण तलावाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन जातील. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू घडविण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

      यावेळी कुलकर्णी अ‍ॅकेडमीच्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या जलतरण पटूंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भुपाली कुलकर्णी यांनी केले तर आभार जय बोरा यांनी मानले.