सुमन काळे खटल्यात सीआयडी वकिलांची नियुक्ती करा : चव्हाण

बहुचर्चित सुमन काळे हिच्या खून खटल्यात राज्य गुन्हे अन्वेषण ( सीआयडी ) शाखेने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड . केदार केसकर यांची नियुक्ती करावी , अशी मागणी करण्यात आली आहे . दिवंगत सुमनचा भाऊ गिरीष चव्हाण यांनी राज्यपालांकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे . सुमन काळे हिचा मे २००७ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता . कोठडीत असताना खुनाचे मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करण्यात आला . पोलिसांनी बेकायदेशीरपणे चौकशी करत असताना तिने ‘ आत्महत्या केली , अशा स्वरुपाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते . परंतु , सुमनच्या उत्तरिय तपासणीत तिच्या पोटात विषारी पदार्थ नसल्याचे तसेच मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला . त्यामुळे या अहवालानुसार औरंगाबाद खंडपीठाने या खटल्यात कलम वाढवण्याचे आदेश दिले होते . परंतु , सीआयडीचे अहमदनगरला अधिकृत वकील नसल्याने हा खटला रखडला आहे . सुमनचा भाऊ गिरीश चव्हाण यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली . या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील केदार केसकर यांची सीआयडीचे वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली . याप्रसंगी विवेक विचार मंचाचे कार्यवाह महेश पोहनेरकर , नीलेश धायरकर , रिषभ परदेशी , रोहित धायरकर आदी उपस्थित होते .